आमच्याबद्दल
१८२८ मधील 'कोकण बुक सोसायटी' ते आजचे 'रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय' हा महाराष्ट्रातील सर्वात जुन्या ग्रंथालयाचा व्दिशतकाकडे झुकणारा प्रवास दैदीप्यमान आहे. विद्यमान ग्रंथालय स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे सन १८२८ मध्ये ‘कोकण बुक सोसायटी’ या नावाने छोट्या प्रमाणात सुरु झाले. तत्कालिन ब्रिटीश अधिकारी मि.जे.एच. ट्रॉट यांनी ही छोटेखानी संस्था सुरु केली. सन १८५० मध्ये या संस्थेचे ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे नामकरण व रुपांतर झाले आणि सन १८८८ पर्यंत ते त्याच नावाने चालू होते. याच दरम्यान ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाचनालयाचे सभासद व्हायचे होते. परंतु ‘नेटिव्ह’ हा शब्द असल्याने त्यांना सभासद होण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे ‘नेटिव्ह’ हा शब्द वगळून फक्त ‘जनरल लायब्ररी’ असे नामकरण करुन ब्रिटिश आधिकारी सभासद झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असताना आपली वाचनतृष्णा शमविण्यासाठी या वाचनालयात येत असत. त्यावेळी भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते असलेल्या सावरकरांनीच या वाचनालयाचे शुध्द मराठीत ‘नगर वाचनालय’ असे नामकरण केले. पुढे १९५१ साली वाचनालयाला ‘जिल्हा’ ग्रंथालय म्हणून मान्यता मिळाली व वाचनालयाचे नाव ‘रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय’ असे रुपांतरीत होऊन तेच नाव आजही रुढ आहे.
१८२८
दि.१३.११.१९५२
RTN E/13
६४०६००१
गौरवशाली परंपरा
वाचनालयात सभासद व वाचकांसाठी सुसज्ज व प्रशस्त असा मुक्त वाचन विभाग उपलब्ध आहे. यामध्ये वाचकांसाठी बैठकव्यवस्था, उत्तम प्रकाश व्यवस्था, विवध पुस्तकांची विषयवार मांडणी, विविध वृत्तपत्रे व मासिके उपलब्ध असतात. दररोज या विभागाचा सुमारे 100 पेक्षा जास्त वाचक लाभ घेत असतात.
ग्रंथालयामध्ये ३००० पेक्षा जास्त दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध आहेत. यामध्ये पावगी नारायण भवानराव यांचे ‘भाषाशास्त्र’, रं. स. लाळे यांचे ‘बालचिकित्सासार’, १८९४ मध्ये 'गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी'चा एक भाग म्हणून प्रकाशित झालेले Alexander Kyd Nairne यांनी लिहिलेले ‘History of the Konkan’, Bright J.S. यांचे Speeches on Questions of Public policy तसेच बाबामहाराज सातारकर यांनी संपादित केलेली ‘ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी’ अशा दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. ग्रंथालयातील ग्रंथसंपदा १ लाख १७ हजार पेक्षा जास्त आहे. ग्रंथालयात ग्रंथखरेदी करताना वाचकांची आवड, मागणी व ग्रंथांचा दर्जा यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. प्रकाशित होणारे दर्जेदार साहित्य प्रकाशित होताच ८ दिवसात वाचनालयात उपलब्ध होईल याची दक्षता घेतली जाते. विशेषतः वाचकांनी मागणी केलेले ग्रंथ त्यांना वेळेत उपलब्ध होतील यासाठी ग्रंथालय आग्रही असते. ग्रंथालयात मराठी, इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषेतील साहित्य उपलब्ध असून त्यामध्ये सुमारे २२ हजार कादंब-या, १६ हजार कथा, ८ हजार चरित्र, ३ हजार नाटके, २ हजार संदर्भ ग्रंथ, २ हजार ऐतिहासिक पुस्तके, ६ हजार बालवाचनसाहित्य उपलब्ध आहे.
कोणतीही गावातली ग्रंथालये ही तेथील सांस्कृतिक केंद्रे असतात. म्हणूनच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. गेल्या सुमारे २५ वर्षात २०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वाचनालयाने केले आहे. यामध्ये साहित्यिकांची व्याख्याने, आरोग्यविषयक व्याख्याने, संगीत मैफीली, कवी संमेलने, मुलाखती, परिसंवाद असे दर्जेदार कार्यक्रम झाले आहेत. यामध्ये डॉ. अभय बंग, वसंत वसंत लिमये, दीपक करंजिकर, अशोक समेळ, अच्च्युत गोडबोले, पं.शौनक अभिषेकी, सुधीर गाडगीळ, आशालता वाबगावकर अशा अनेक मान्यवरांनी आपले सादरीकरण केले आहे. त्याचबरोबर ग्रंथालयात असणा-या दुर्मिळ साहित्याची ओळख साहित्यप्रेमीना, वाचकांना व्हावी या उद्देशाने प्रसंगानुरुप विविध विषय घेऊन ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शने भरवीली जातात. तसेच मे महिन्याच्या सुट्टीत बाल वाचकांसाठी मोफत वाचन कट्टा, वाचलेल्या पुस्तकांच्या अनुषंगाने विविध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते.
सन १९९० मध्ये ६४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी येथे संपन्न झाले. या संमेलनाचे आयोजन रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने केले होते. तसेच सन २०१६ मध्ये २८ व्या स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजनही रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने केले होते.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय हे महाराष्ट्रातील संगणकीकृत असलेले पहिले ग्रंथालय आहे. ग्रंथालयाचे सर्व ग्रंथालयीन कामकाज हे ग्रंथालयाने स्वतः विकसित केलेल्या लिम्ज प्रणाली (Library Management System) व्दारे चालते. या प्रणालीमध्ये ग्रंथालयातील सर्व पुस्तक देवघेव, पावत्या, खर्चाच्या नोंदी, हिशेब दस्ताऐवज तयार करणे सहज शक्य होते. त्यासाठी आवश्यक असलेला सर्व तपशील म्हणजे ग्रंथालयातील ग्रंथसंपदा व सभासद यांची नोंद संगणकावर करण्यात आली आहे. त्यामुळे वाचकाला आवश्यक असलेले पुस्तक दाखल क्रमांक, पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशक, विषय आदी पैकी कोणत्याही उपलब्ध माहितीच्या आधारेही शोधणे सहज शक्य होते व वाचकाचा वेळ वाचतो. शिवाय देवघेव व पावती नोंदही संगणकाच्या माध्यमातून होत असल्यानेही हाती नोंदींसाठी लागणा-या वेळेची बचत होते
ग्रंथालयाने वाचनालयातील उपलब्ध ग्रंथसंपदेच्या आधारे ओपॅक सेवेसाठी Ratnagiri Nagar Vachanalay या नावाचे अँड्रॉईड अॅप विकसित केले आहे. यावरही ग्रंथांबातच्या सर्व नोंदी उपलब्ध असल्यामुळे वाचकाला आवश्यक असलेले पुस्तक शोधण्यासाठी त्या पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशक, विषय,पुस्तकांची उपलब्धी तसेच प्रकाशनवर्ष यापैकी कोणत्याही उपलब्ध माहितीच्या आधारेही शोधणे सहज शक्य होते व वाचकाचा वेळ वाचतो. हे अॅप प्लेस्टोअर ला विनाशुल्क उपलब्ध आहे. त्यामुळे सभासदांव्यतिरिक्त अन्य व्यक्तीही हे अॅप डाऊनलोड करुन ग्रंथालयातील ग्रंथसंपदा घरबसल्या पाहू शकते. या अॅपचा वापर करुन वाचक त्यांना हवे असलेले पुस्तक घरीच शोधून ग्रंथालयात येण्यापूर्वी वाचनालयात कळवतात. अशावेळी ती पुस्तके देवघेव विभागात उपलब्ध करुन ठेवली जातात व वाचकाचा वेळ वाचतो.
आमच्या कार्यकारी मंडळाचे सन्माननीय सदस्य